जम्मू-काश्मीरमध्ये सज्जाद लोन यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते केंद्र- राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:35 PM2018-11-27T15:35:02+5:302018-11-27T15:35:11+5:30
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील विधानसभा विसर्जित झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. केंद्र सरकार सज्जान लोन यांना जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री बनवू इच्छित होते. परंतु जर केंद्र सरकारनं असं केलं असतं तर ती प्रकारची गद्दारी ठरली असती, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. मी दिल्लीकडे पाहिलं असतं, तर मला लोन यांचं सरकार बनवावं लागलं असतं आणि मी इतिहासात बेइमान माणूस म्हणून ओळखला जाऊ लागलो असतो. त्यामुळे ती ते कारणच संपुष्टात आणलं. मी केलेल्या या प्रकारामुळे काही जण मला शिव्या देत आहेत. परंतु मी जे काही केलं आहे, ते योग्यच आहे, असंही सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.
सत्यपाल मलिक म्हणाले, सज्जाद यांच्याकडे संख्याबळ होते. अशातच केंद्र सरकारनं मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचंच नाव सुचवलं असतं. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी सर्व बाजू सांभाळून काम करतोय. 21 नोव्हेंबरला पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्तींनी सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्याच्या काही वेळानंतरच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा विसर्जित केली. त्यानंतर राज्यपालांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. राज भवनातून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. चार महत्त्वाच्या कारणास्तव राज्यपालांनी जम्मू-काश्मीर विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं अवघड आहे. त्यातील काही पक्षांनी विधानसभा विसर्जित करण्याची मागणी केली होती. तसेच जनदेशाचा अनादर करून कोणतंही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेत घोडेबाजाराला ऊत येण्याचीही भीतीही राज्यपालांना व्यक्त केली होती.