Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:28 PM2022-04-22T12:28:37+5:302022-04-22T12:30:17+5:30
Indian Army: भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी करत भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे.
श्रीनगर: भारतीय लष्कराच्या शौर्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंथन पासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे 16 लोक तेथे अडकले होते, माहिती मिळताच लष्कराचे जवान पायी चालत तिथे गेले आणि त्यांचे प्राण वाचवले. तिथे पोहचण्यासाठी अतिशय कमी तापमानात जवानांना खूप संघर्ष करावा लागला. आता जवानांच्या धाडसाचे आणि मेहनतीचे कौतुक होत आहे.
Jammu and Kashmir | Braving inclement weather conditions, Indian Army soldiers walked for 15 km during continuous snowfall & zero visibility and successfully rescued 16 civilians stranded amid heavy snowfall from Sinthan Pass of Kishtwar district.
— ANI (@ANI) April 21, 2022
(Source: PRO Defence Jammu) pic.twitter.com/NtXCAKr8b0
काय आहे संपूर्ण प्रकरण
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, किश्तवाड जिल्ह्यात सतत बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानता असतानाही, लष्कराच्या जवानांनी केवळ 15 किमी अंतर कापले नाही तर तेथे अडकलेल्या 16 लोकांना बाहेर काढले. या भागात 16 लोक अडकल्याची बातमी दुपारी 3 वाजता लष्कराला मिळाली, त्यानंतर तात्काळ जवानांचे एक पथक निघाले. हे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना औषधे व खाद्यपदार्थ देण्यात आले. या बचाव कार्याबद्दल लष्कराच्या जवानांचे कौतुक केले जात आहे.
लष्कराचे प्रवक्ते काय म्हणाले?
या प्रकरणी बोलताना लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद म्हणाले, "सिंथनमध्ये काहीजण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यांच्या बचावासाठी एक पथक तयार करण्यात आले. भीषण बर्फवृष्टी आणि दृश्यमानता नसतानाही टीमने NH 244 वर सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पायी कापले आणि सिंथन खिंडीजवळील नागरिकांना वाचवले."