Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:48 PM2021-10-19T17:48:11+5:302021-10-19T17:54:57+5:30
Indian army killed six lashkar terrorists : राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली.
नवी दिल्ली - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान सैन्याला मोठं यश मिळालं आहे. मंगळवारी जवानांनी पाकिस्तानमधील "लष्कर-ए-तोयबा" या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली. सैन्याच्या 16 पोलीस बटालियनकडून याच भागात लपून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरू आहे.
राजौरी सेक्टरमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी 16 ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरू असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील तेव्हा उत्तर द्यावे असा सल्ला दिला आहे.
अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना जोर
एका भारतीय कमांडरने दिलेल्या माहितीनुसार, "हे दहशतवादी जंगलामधून दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्याने भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले". गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 9 ते 10 दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केली. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना जोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक
लष्करप्रमुख एमएम नरवणे, पुंछमध्ये नऊ जवानांना आलेले हौतात्म्य आणि दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक केली आणि सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. येथे त्यांच्यासोबत व्हाइट नाइट कोरचे जीओसी, नॉर्दर्न कमांडचे जीओसी आणि इतर अधिकारीही होते. यानंतर ते नगरोटा लष्करी मुख्यालयत गेले. नरवणे यांनी, पुंछमध्ये घेरलेले दहशतवादी कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नयेत, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.