जम्मू काश्मीर : त्राल येथील चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:09 PM2020-01-12T12:09:28+5:302020-01-12T12:10:46+5:30
दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्राल येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने रविवारी सकाळी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले.
शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये एक डीएसपीच्या कारमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज त्राल येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमधील गुलशनपोरा परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरू होती. त्यावेळीच ही चकमक झाली. त्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले.
गेल्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. आता दहशतवादी दोन किंवा तीनच्या गटांमध्ये हालचाली करतात. यापूर्वी दहशतवादी हे सहा ते सात जणांच्या ग्रुपमधून येत असत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चेकिंगदरम्यान एका गाडीतून हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबत गाडीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक (डिएसपी)होते. सुरक्षा दलांनी या पोलीस उपअधीक्षकांना सुद्धा अटक केली आहे. हे पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेते आहेत.
काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक
सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?
PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....
दोन दहशतवाद्यांमध्ये सय्यद नवीद मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू असून ज्याचा नंबर दहशतवाद्यांचा प्रमुख रियाज नायकूनंतर येतो. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आसिफ राथर आहे. या दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षकांचे नाव देविंदर सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे. ते एअरपोर्ट सिक्युरिटीसाठी तैनात होते.