'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 21:15 IST2025-01-14T21:14:41+5:302025-01-14T21:15:21+5:30
'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. '

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा
Rajnath Singh : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके आणि पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 9व्या सशस्त्र सेना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीर पीओकेशिवाय अपूर्ण आहे. पीओके पाकिस्तानचा नाही, तर भारताचा भूभाग आहे. पीओकेच्या जमिनीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातोय. पीओकेमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, असा दावा त्यांनी केला.
पीओकेमध्ये दहशतवादी केंद्रे
जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे माजी सैनिकांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. सीमेजवळील भागात लाँच पॅड बनवण्यात आले आहेत. भारत सरकारला याची संपूर्ण माहिती आहे. पाकिस्तानने पीओकेत दहशतवादी कारवाया थांबवाव्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Addressing the Ex-servicemen on the occasion of ‘Veterans Day’ at Akhnoor (J&K). https://t.co/AsE7JmwnXK
— Rajnath Singh (@rajnathsingh) January 14, 2025
भारत नेहमीच पाकिस्तानला वरचड
संरक्षण मंत्री पुढे म्हणतात, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 मध्ये अखनूर येथे युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले. इतिहासातील सर्व युद्धांमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान 1965 पासून अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजही भारतात घुसणारे 80% पेक्षा जास्त दहशतवादी हे पाकिस्तानचे आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद 1965 मध्येच संपुष्टात आला असता, परंतु तत्कालीन केंद्र सरकार योग्य पाऊले उचलू शकली नाही.
जम्मू-काश्मीरच्या मुस्लिमांचा पाकिस्तानला पाठिंबा नाही
राजनाथ सिंह म्हणाले, 1965 च्या युद्धादरम्यान किंवा दहशतवादाच्या शिखरावर असताना जम्मू-काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानला साथ दिली नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी दहशतवादाशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोहम्मद उस्मान यांच्यासारख्या व्यक्तींच्या बलिदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.
ओमर अब्दुल्लांचे कौतुक
राजनाथ सिंह यांनी ओमर अब्दुल्लांचे कौतुक केले. ते म्हणाले की, काश्मीर आणि देशाच्या इतर भागांमध्ये असलेली दरी कमी करणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या दिशेने पावले उचलली जात आहेत. अखनूरमधील वेटरन्स डे सेलिब्रेशनने हे सिद्ध केले की, अखनूरचे आपल्या हृदयात दिल्लीसारखेच स्थान आहे.
सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देते
संरक्षण मंत्री म्हणाले की, भाजप सरकार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरला समान वागणूक देते. पूर्वीच्या सरकारांनी काश्मीरला वेगळी वागणूक दिली होती. याचा परिणाम असा झाला की या भागातील आपले बंधू-भगिनी दिल्लीशी ज्या प्रकारे जोडले जायला हवे होते, तसे होऊ शकले नाहीत. मला भूतकाळात जायचे नाही कारण आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश हे आहे की, आम्ही काश्मीर आणि देशाच्या इतर सर्व भागांमधील अंतःकरणातील दरी कमी करण्याचे काम करत आहोत.