शिक्षिकेच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतीचं वातावरण; 100 हून अधिक हिंदू कुटुंबांनी केलं पलायन- रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:11 AM2022-06-02T01:11:39+5:302022-06-02T01:15:05+5:30
श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
काश्मीर खोऱ्यात वाढलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनी सरकारसमोर नवी समस्या उभी केली आहे. कुलगाममध्ये एका हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर किमान 100 हिंदू कुटुंबांनी काश्मीरमधून पलायन केल्याचा दावा एका समुदायाच्या नेत्याने बुधवारी केला. श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
बारामुल्लामधील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांनी म्हटले आहे, की मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास अर्ध्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. कालच्या हत्येनंतर ते घाबरले होते, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ. आम्ही सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. ते म्हणाले, सरकारने आमचे काश्मीरमधून बाहेर स्थानांत करण्यास सांगितले होते.
श्रीनगरचा भाग सील -
पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे, तसेच ज्या भागांत काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहत त्या भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही. मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.