जम्मू आणि काश्मीर राष्ट्रपती राजवटीकडे
By admin | Published: January 9, 2015 02:05 AM2015-01-09T02:05:02+5:302015-01-09T02:05:02+5:30
ओमर अब्दुल्ला यांच्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयानंतर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे चित्र आहे़
नवी दिल्ली /श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील राजकीय पेचप्रसंगाने गुरुवारी अचानक वेगळे वळण घेतले़ ओमर अब्दुल्ला यांच्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयानंतर राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे चित्र आहे़ निवडणूक आयोगाने या राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
राज्यपाल एऩएऩव्होरा यांनी केंद्राला आपला अहवाल पाठवला असून त्यात, जम्मू-काश्मिरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासह दोन ते तीन पर्याय सुचवले असल्याचे कळते़
ताज्या विधानसभा निवडणकीत त्रिशंकू कौल मिळाल्याने कुठलाही पक्ष सरकार स्थापनेच्या स्थितीत नाही़ सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला पीडीपी आणि दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा दोन्हींकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापनेबाबत ठोस संकेत मिळालेले नाहीत़ त्यामुळे सरकार स्थापनेबाबत कुठल्याही ठोस हालचाली होत नसल्याचे बघून राज्यपालांनी केंद्राकडे आपला अहवाल पाठविला असल्याचे समजते़ या अहवालात राज्यपालांनी दोन तीन पर्याय सुचवले आहेत. यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाही एक पर्याय असल्याचे कळते़
(लोकमत न्यूज नेटवर्क)
ओमर काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडणार
श्रीनगर : सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार व घुसखोरीचे प्रयत्न बघता, राज्यात पूर्णवेळ प्रशासनाची गरज असल्याचे सांगत, जम्मू-काश्मीरचे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय ओमर अब्दुल्ला यांनी घेतला आहे़ ओमर यांनी राज्यपालांची भेट घेऊन या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.