"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:22 PM2024-09-11T16:22:43+5:302024-09-11T16:28:32+5:30

जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Jammu and Kashmir rally Congress President Mallikarjun Kharge targeted BJP | "अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

"अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे..."; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

Mallikarjun Kharge : जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपकडून जम्मू काश्मीरमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही प्रचारसभा घेत आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत आणखी २० जागा आल्या असत्या तर सगळे तुरुंगात गेले असते, असे खरगे यांनी म्हटलं. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी मजबूत असल्याचेही खरगेंनी म्हटलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये एका सभेला संबोधित भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, तरीही पंतप्धान मोदी खोटे बोलायला मागे हटत नाहीत. कारण ते लबाडांचे सरदार आहेत, असे खरगे म्हणाले. धर्माच्या नावावर इथल्या जनतेत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही खरगेंनी यावेळी म्हटलं.

भाजपवर निशाणा साधताना खरगे यांनी ४०० पारच्या घोषणेचाही उल्लेख केला. "४०० पारची घोषणा देणारे कुठे गेले? ते २४० जागांपर्यंत थांबले आहेत. आम्हाला आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व लोक तुरुंगात गेले असते. हे लोक तुरुंगात जाण्यास पात्र आहेत. भाजपचे लोक अनेक भाषणे देतात. पण कृती आणि शब्दात खूप फरक आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती कमकुवत होणार नाही. संसदेत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आता त्याच ताकदीने आपण पुढे जाऊ," असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.

"नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती पाहून भाजप हादरला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरची यादी वारंवार बदलत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इंडिया आघाडीची एकजूट पाहून भाजपचे लोक घाबरले आहेत. आता आम्ही राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला एकत्र आलो तेव्हा भाजप आणखीनच घाबरला," असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"भाजपचे ५ लाख नोकऱ्यांचे आश्वासन हा जुमला आहे. यापूर्वीही त्यांनी असेच सांगितले होते. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले का? त्यांनी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. आता १० वर्षे झाली तरी इथे १ लाख लोकांना भरती करू शकले नाहीत. मग ते 5 पाच लाख नोकऱ्या कशा देणार. जे खोटे बोलतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना आवाहन करतो की, जे सत्य बोलतात आणि स्वातंत्र्यापासून त्यांच्यासोबत आहेत त्यांना मतदान करा," असेही आवाहन खरगे यांनी केलं.

Web Title: Jammu and Kashmir rally Congress President Mallikarjun Kharge targeted BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.