लष्कराचा दणका; काश्मीरमध्ये वर्षभरात 200 दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:02 AM2018-11-14T09:02:21+5:302018-11-14T09:05:56+5:30
लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं
श्रीनगर: यंदाच्या वर्षात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. भारतीय जवानांनी काल काश्मीर खोऱ्यातील केरन सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे यंदाच्या वर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईत कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 200 वर गेला आहे. वर्ष संपायला अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कारवाई सुरुच असल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
यंदाच्या वर्षात काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई केली. लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईचा मोठा दणका जैश-ए-मोहम्मदला बसला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 50 टक्के दहशतवादी मारले गेले. तर हिज्बुलच्या 40 टक्क्यांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोयबालादेखील भारतीय जवानांनी दणका दिला. त्यांचे 33 टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले.
यंदाच्या वर्षात भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात दुहेरी कारवाई केली. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच स्थानिक दहशतवाद्यांचंही आव्हान लष्करासमोर होतं. हे दुहेरी आव्हान लष्करानं यशस्वीपणे पेललं. 2017 मध्ये काश्मीरमध्ये लष्करानं ऑपरेशन ऑल आऊट सुरू केलं होतं. त्याच प्रकारची कारवाई लष्करानं यंदाच्या वर्षातही केली. रमजानच्या पवित्र महिन्यात मोदी सरकारनं काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. त्या काळात दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. त्यामुळे सरकारवर टीकाही झाली. मात्र रमजान संपताच लष्करानं दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.