Jammu-Kashmir: "परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत दिला जाईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:03 PM2021-07-28T17:03:59+5:302021-07-28T17:07:54+5:30
Jammu-Kashmir: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं.
नवी दिल्ली: 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये विभाजित केलं होतं. तेव्हापासून काश्मीरमधील विरोधी नेते राज्याला विशेष राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे.
परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा दिला जाईल, असं मोठं विधान गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केलं आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, 24 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती, त्यातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हाही पंतप्रधानांनी हेच विधान केलं होतं. मला विश्वास आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल.
दहशतवादी कारवाया कमी झाल्या
खासदार सस्मित पात्रा यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर प्रश्न विचारला. त्यावर नित्यानं राय म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादामध्ये 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 59% घट झाली. तर, 2020 च्या तुलनेत जून 2021 पर्यंत या घटना 31% कमी झाल्या. नित्यानंद पुढे म्हणाले की, सरकारची दहशतवाद्यांविरोधात झिरो टॉलरेंसची रणनिती आहे. मागील काही वर्षात सरकारने राज्यातील सुरक्षा मजबुत करण्यासाठी अनेक ठोस पाउलं उचलली आहेत.