जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:15 PM2022-10-15T14:15:03+5:302022-10-15T14:15:43+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटना सुरू केल्या आहेत.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. यावेळेस दहशतवाद्यांनी राज्याबाहेरील व्यक्तीला नाही, तर काश्मिरी पंडितांवर निशाणा साधला आहे. काश्मीर झोनमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
#Update | Terrorists fired upon a civilian (minority) Puran Krishan Bhat while he was on his way to an orchard in Chowdari Gund, Shopian. He was immediately shifted to hospital for treatment where he succumbed. Area cordoned off. Search in progress: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 15, 2022
अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतली नाही. कोणत्या संघटनेने ही टार्गेट किलिंग केली, याबाबत पोलिसांनाही माहिती नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक नागरिक (काश्मिरी पंडित) पूरण कृष्ण भट यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी शोपियानच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे.
टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ
जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.
महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या
यानंतर 31 मे रोजी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी रजनीबाला या महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. ती सांबा येथील रहिवासी होती. कुलगाममधील गोपालपोरा येथे त्यांची हत्या करण्यात आली. रजनी या गोपाळपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
2 जून रोजी बँक व्यवस्थापकावर गोळीबार
यानंतर 2 जून रोजी राजस्थानमधील हनुमानगढ येथील रहिवासी कुलगाममधील बँक मॅनेजरवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील देहाती बँकेत तैनात होते. टार्गेट किलिंगच्या या घटना घडवणाऱ्या बहुतांश दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.