Jammu and Kashmir: काश्मीर टार्गेट किलिंग: काश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:21 PM2022-08-16T13:21:13+5:302022-08-16T13:32:03+5:30
Jammu and Kashmir: दहशतवाद्यांना पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडवून आणली असून, ऑगस्ट महिन्यातील ही तिसरी घटना आहे.
Terrorist Attack on Civilian in Shopian: गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडीतांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक काश्मिरी पंडीत आणि बिगर काश्मिरी नागरिकांचा मृत्यू झालाय. आता परत एकदा अशाच प्रकारची घटना शोपियांमध्ये घडली आहे. सोमवारी शोपियांच्या छोटापोरा भागातात दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या दोन भावांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात सुनील भट्ट मृत्यूमुखी पडले तर त्यांचा भाऊ जखमी आहे.
ऑगस्टमधील हा तिसरा हल्ला
यावर्षी शोपियांमध्ये परप्रांतीय मजूर आणि स्थानिक लोकांवर दहशतवादी सातत्याने हल्ले करत आहेत. या महिन्यात सामान्य नागरिकांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मोहम्मद अमरेज असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी, दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे एका गैर-काश्मिरी मजुराची हत्या केली, तर अन्य दोन जण या हल्ल्यात जखमी झाले होते. मुहम्मद मुमताज असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी होता.
मे आणि जूनमध्ये 10 हल्ले झाले
यापूर्वी मे आणि जून महिन्यात दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 26 दिवसांत 10 घटना घडल्या. यानंतर अनेक मजुरांनी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. पोलीस आणि प्रशासनाने टार्गेट किलिंगबाबत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, लोकांना त्यांच्या सुरक्षेची हमीही दिली होती. पण, आता पुन्हा अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.