नवीन सरकार येताच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु; शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:44 PM2024-10-18T15:44:32+5:302024-10-18T15:45:52+5:30

जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये बिगर काश्मीरी नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली आहे.

Jammu and Kashmir Terrorists shot dead a non Kashmiri youth in Shopian security forces cordoned off the area | नवीन सरकार येताच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु; शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची हत्या

नवीन सरकार येताच जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु; शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची हत्या

Jammu and Kashmir : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला काही दिवस उलटत नाही तोवर जम्मू काश्मीरमध्ये हल्ले सुरु झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका परराज्यातील एका व्यक्तीला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये संघटित दहशतवाद कमी झाल्यानंतर टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या वर्षीही दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागात हिंदू आणि बिगर काश्मिरी लोकांची हत्या केली होती. अनंतनाग, पुलवामा आणि पुंछमध्ये टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा शोपियानमध्ये बिगर काश्मिरी तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चौहान असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपास सुरू केला. मात्र, या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बुधवारी ओमर अब्दुला यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक पार पडली. ओमर अब्दुला यांच्यासह यावेळी पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. यातील तीन मंत्री हे जम्मू आणि दोन काश्मीर खोऱ्यातील आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्र्यांना दल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमाभागातील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहिम सुरु केली आहे. काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने गुरसाई टॉप भागातील मोहरी शाहस्टारमध्ये संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यात काही वेळात गोळीबार झाला. 

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग करत असताना हब्बा कादल भागात शीख समुदायाच्या दोन लोकांना एके रायफलने गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यात अमृतसर येथील रहिवासी अमृत पाल आणि रोहित यांचा मृत्यू झाला. त्याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती.
 

Web Title: Jammu and Kashmir Terrorists shot dead a non Kashmiri youth in Shopian security forces cordoned off the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.