जम्मू-काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 10:08 AM2024-09-09T10:08:07+5:302024-09-09T10:09:27+5:30
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला आहे. जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना घुसखोरीची माहिती मिळाली होती, त्यानंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला होता.
दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन एके-47 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. याआधी ३० ऑगस्टलाही भारतीय लष्कराच्या जवानांनी निवडणुकीपूर्वी दहशतवादाचा मोठा कट उधळून लावला होता. यावेळी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील ९० विधानसभा जागांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील जनता १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी आपले सरकार पाच वर्षांसाठी निवडण्यासाठी मतदान करेल.
सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील केंद्रशासित प्रदेशात तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ जागांवर, दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे.