जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून शोधमोहीम सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 09:46 AM2017-12-11T09:46:27+5:302017-12-11T11:12:05+5:30
जम्मू- काश्मीर मधील हंदवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.
श्रीनगर- जम्मू- काश्मीर मधील हंडवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. यामध्ये एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक थांबली असून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी मिळाल्याची माहिती मिळते आहे.
J&K: 3 terrorists gunned down & one civilian also lost her life during encounter that started late last night in Handwara's Unisoo. Search ops still underway. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/JQ3eaWpASH
— ANI (@ANI) December 11, 2017
शनिवारी शोपिया येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. पण अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली होती.
याआधी शुक्रवारी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय जवान जखमी झाला होता. 5 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर येथे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत केली जाते आहे, असं बोललं जातं आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या चकमकींमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. अनेकांना जिवंत पकडण्यात यश आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत 205 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.