जम्मू हल्ला: भारतीय लष्कराने रणगाडे तैनात केले, पाच महिला, दोन लहान मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:03 PM2018-02-10T22:03:13+5:302018-02-10T22:07:32+5:30
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध चकमक सुरु असलेल्या सुंजवा लष्करी तळाच्या आत लष्कराने अभिमन्यू रणगाडे तैनात केले आहेत.
श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध चकमक सुरु असलेल्या सुंजवा लष्करी तळाच्या आत लष्कराने अभिमन्यू रणगाडे तैनात केले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. सुंजवा लष्करी तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांविरोधात पहाटेपासून कारवाई सुरु आहे. या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले असून आपले दोन जवान शहीद झाले आहेत. रहिवाशी वस्ती असलेल्या भागात हे दहशतवादी असल्याने जीवीतहानी टाळण्यासाठी संभाळून कारवाई करावी लागत आहे.
पाच महिला आणि दोन लहान मुले दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत अशी माहिती लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी दिली. लष्कर प्रमुख बिपिन रावत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूमध्ये दाखल झाले आहेत. आपण मित्र बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही. भारत एक सहिष्णू देश आहे. पण कोणी सीमा ओलांडून आपल्या देशात घुसत असेल तर नक्कीच त्याला ताकत दाखवू. सर्जिकल स्ट्राइकची करण्याची आपली क्षमता असून आज जग आपल्या ताकतीबद्दल बोलते असे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.
#JammuAndKashmir: Armoured vehicles deployed at #SunjwanArmyCamp (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/y1QROZRjNm
— ANI (@ANI) February 10, 2018
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून एके-47, एके-56 रायफल आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास दहशतवादी सुंजवा लष्करी तळावर घुसले व हल्ला केला. दोन ते तीन दहशतवादी असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात ज्युनिअर कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे.