५० हजार देऊन मुलाकडून जम्मूत बॉम्बस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:46 AM2019-03-09T04:46:33+5:302019-03-09T04:46:40+5:30
गुरुवारी जम्मू बसस्थानकातील बॉम्बहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या हल्लेखोराचे वय सोळाहून कमी आहे.
जम्मू : गुरुवारी जम्मू बसस्थानकातील बॉम्बहल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या हल्लेखोराचे वय सोळाहून कमी आहे. बॉम्बहल्ला करण्यासाठी हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याने ५० हजार रुपये दिले होते, अशी कबुली या अल्पवयीन हल्लेखोराने दिली आहे. हल्लेखोराचे वय लक्षात घेता दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी लहान मुलांचा वापर सुरू केल्याचे संकेत मिळतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्लेखोर मुलगा १२ मार्च रोजी सोळा वर्षांचा होईल. बसस्थानकात हातबॉम्बने हल्ला केल्यानंतर पळून जात असताना त्याला पकडण्यात आले होते. या हल्ल्यातील एका जखमीचा गुरुवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. गुरुवारी सकाळी ११.५० वाजता झालेल्या या हल्ल्यात उत्तराखंडचा मोहम्मद शरीक ठार झाला होता. चौकशीत या मुलाने पोलिसांना सांगितले की, हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याने बॉम्ब डागण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. आधार कार्ड, शाळेतील नोंद आणि ओळख पटविण्याच्या अन्य पुराव्यांनुसार त्याची जन्मतारीख १२ मार्च २००३ आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याआधी त्याच्या वयाबाबत खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाईल. (वृत्तसंस्था)
>बॉम्बहल्ला करण्यास दिला होता नकार
चौकशी अधिकाऱ्यांनुसार हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कुलगाम जिल्ह्याचा प्रमुख फैयाज याने जम्मूत कोणत्याही वर्दळीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी संघटनेचा भूमिगत कार्यकर्ता मुझम्मील याच्याकडे बॉम्ब सुपूर्द केला होता; त्याने बॉम्बहल्ला करण्यास नकार दिला. मग त्याला हा बॉम्ब छोटू असे सांकेतिक नाव असलेल्या मुलाकडे पोहोचता करण्यास सांगण्यात आले. छोटूचे छायाचित्रही मुझम्मील याला दाखविण्यात आले. छोटू सध्या पोलीस कोठडीत आहे. ज्याच्याकडे बॉम्ब दिला, तो हाच मुलगा असल्याचे मुझम्मीलने ओळखले.