जम्मूतील नागरिकही शत्रूविरोधात सज्ज!
By admin | Published: October 13, 2016 06:21 AM2016-10-13T06:21:57+5:302016-10-13T06:21:57+5:30
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील काही गावे कायम दहशतवादाच्या छायेत राहणारी आहेत. या गावांतील प्रत्येक नागरिकाला चोवीस तास संरक्षण
संकेत सातोपे/ मुंबई
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील काही गावे कायम दहशतवादाच्या छायेत राहणारी आहेत. या गावांतील प्रत्येक नागरिकाला चोवीस तास संरक्षण पुरविणे लष्करासाठीही अशक्य आहे. त्यामुळे ‘तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई’, या उक्तीनुसार येथील ग्रामस्थांच्या हातीच शस्त्र देण्याचा निर्णय शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘व्हिलेज डिफेन्स कमिटी’(व्हीडीसी)मध्ये सहभागी ग्रामस्थ सध्याच्या अशांततेच्या काळात भारतीय लष्कराला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सज्ज झाले आहे. सीमेपलिकडचा शत्रू कधीही येवो. आम्ही पूर्ण सज्ज आहेत, असे पुँछमधील कुलाली, हिलकाका येथील व्हीडीसीचे पदाधिकारी मोहम्मद फारूख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर नियंत्रण रेषेजवळील परिस्थिती संवेदनशील बनली आहे. विशेषत: पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सातत्याने तोफगोळे डागण्यात येत आहेत. त्यामुळे येथील नागरी जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कधीही युद्धाला तोंड फुटेल आणि आपल्या घरादारावर वरवंटा फिरेल, अशी धास्ती गावकऱ्यांनी घेतली आहे.
मात्र या बाक्याप्रसंगी व्हीडीसीकडून लष्कराला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. गावकऱ्यांचे मनोबल वाढविणे, काही बितंबातम्या लष्कराला पुरविणे आणि वेळेला लष्कराच्या खांद्याला खांदा लावून लढाईला उभे राहणे, अशी सर्वप्रकारची कामे व्हीडीसीचे कार्यकर्ते उत्साहाने करीत आहेत, अशी माहिती फारूख यांनी दिली.