जम्मू भागालाच तेलाचा पुरवठा युनियन करणार
By Admin | Published: August 23, 2016 05:28 AM2016-08-23T05:28:59+5:302016-08-23T05:28:59+5:30
पेट्रोल टँकर मालकांनी जम्मू भागाला पेट्रोल आणि डिझेलचा पुन्हा पुरवठा करण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
जम्मू : जम्मू आणि काश्मीर आॅईल टँकर ड्रायव्हर्स, कंडक्टर्स युनियन आणि पेट्रोल टँकर मालकांनी जम्मू भागाला पेट्रोल आणि डिझेलचा पुन्हा पुरवठा करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. विभागीय प्रशासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दाखविल्यानंतरहा निर्णय घेण्यात आला. काश्मीरच्या बहुसंख्य भागांत तसेच जम्मू व लडाखच्या काही भागात सुरू असलेले आंदोलन, हिंसाचार, आणि संचारबंदी वा अशांतता यामुळे तिथे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा गेले दीड महिने जवळपास पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तेथील जनतेचे हाल सुरू आहेत. त्यावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले असले तरी त्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ जम्मू परिसरातच पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जाणार आहे.
मात्र युनियनने सरकार जम्मू-श्रीनगरराष्ट्रीय महामार्गावर (विशेशत: दक्षिण काश्मीरमध्ये) सुरक्षा पुरवणार नाही, तोपर्यंत काश्मीर आणि लडाखला तेलाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. टँकर्स ओनर असोसिएशनचे अध्यक्ष अनन शर्मा यांनी तेलाच्या टँकरचा संप मागे घेण्यात आल्याचे व पेट्रोल व डिझेलचा पुरवठा फक्त जम्मू विभागाला करण्यात येईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)