जम्मूमध्ये वासुकी नाग मंदिरावर हल्ला, केली तोडफोड; संतप्त जमावाचं आंदोलन, जाळले टायर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:46 PM2022-06-06T13:46:41+5:302022-06-06T13:48:40+5:30
Vasuki Nag Temple : प्राचीन वासुकी नाग मंदिरावर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राचीन वासुकी नाग मंदिरावर (Vasuki Nag Temple) काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संघटनांनी मंदिरावर हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जम्मूपासून जवळपास 185 किमी अंतरावर असलेल्या डोडामधील भद्रवाहमध्ये एक प्राचीन वासुकी नाग मंदिर आहे. हे मंदिर भद्रकाशी या नावाने देखील ओळखले जाते. सोमवारी पहाटे मंदिराची तोडफोड झाल्याचे पाहून पुजाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. रविवारी रात्री किंवा पहाटे मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. ही बाब परिसरातील नागरिकांना समजताच ते संतप्त झाले. हिंदू संघटनांच्या आवाहनावर लोकांनी जोरदार निदर्शने सुरू केली. रस्त्यावर टायर जाळले जात आहेत. तेथे सातत्याने आंदोलन सुरू आहेत.
जम्मूमध्ये मंदिरांवर सातत्याने होताहेत हल्ले
गेल्या अनेक दिवसांपासून जम्मूमधील हिंदू मंदिरांना लक्ष्य केलं जात आहेत. येथे सातत्याने तोडफोड सुरू आहे. या भागात वासुकी नाग मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. सकाळी पुजारी येथे आल्यानंतर तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच मंदिराबाहेर मोठी गर्दी झाली. मंदिरावरील हल्ल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लोकांनी हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्यांची श्रद्धा याच्याशी जोडलेली आहे असं म्हटलं आहे. मंदिराची तोडफोड करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी. या मंदिराचे दरवाजे, खिडक्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरातील मूर्तींचीही हानी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मूर्तींवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.