जम्मू-काश्मीरमध्ये 7 दिवसांत 6 चकमक; 4 पाकिस्तानींसह 9 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 12:31 PM2022-01-07T12:31:03+5:302022-01-07T12:31:10+5:30
2021 मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 182 अतिरेक्यांना ठार केले, त्यापैकी 168 काश्मीरचे होते.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे वर्ष दहशतवाद्यांसाठी प्राणघातक ठरत असून या वर्षाच्या पहिल्या एका आठवड्यात खोऱ्यात 6 चकमक घडल्या, ज्यात सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार मारले. त्यात लष्कराच्या एका प्रमुख कमांडरसह 4 पाकिस्तानीही होते. विशेष म्हणजे, 2021 मध्ये सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 182 अतिरेक्यांना ठार केले, त्यापैकी 168 काश्मीरचे होते.
एका आठवड्यात झालेल्या सहा चकमकींपैकी दोन चकमकी श्रीनगर जिल्ह्यात, एक उत्तर काश्मीरमधील कुपवाडा, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात प्रत्येकी एक झाली. तसेच, आज मध्य काश्मीरमधील बडगाममध्येही झाली. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी रोजी लष्कराने बॉर्डर अॅक्शन टीमच्या एका घुसखोराला ठार केले, जो लष्कराच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याची ओळख कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये लष्कर कमांडर मुहम्मद शब्बीर मलिक म्हणून होती.
तासाभरात दोन अतिरेक्यांना ठार केले
3 जानेवारी रोजी श्रीनगरच्या बाहेरील शालीमार आणि गुस येथे एका तासाच्या आत दोन चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना ठार केले. त्यात 2016 पासून सक्रिय असलेला लष्कर कमांडर सलीम पारे आणि एक पाकिस्तानी अतिरेकी हमजा मारला गेला. 4 जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील ओके गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन स्थानिक अतिरेकी ठार झाले.
पाचवी चकमक दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम येथे झाली, ज्यात 1 पाकिस्तानी वंशाचा जैशचा अतिरेकी आणि 2 इतर अतिरेकी सुरक्षा दलांनी मारले. 6 जानेवारी रोजी मध्य काश्मीरमधील जोलवा क्रालपुरा बडगाममध्ये संध्याकाळी उशिरा पहिली घेराबंदी आणि शोध सुरू झाला, त्यानंतर तेथे चकमक झाली. त्यात तीन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन चालू आहे.
गेल्या वर्षी 182 दहशतवादी मारले गेले
गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी 100 यशस्वी बंडखोरी कारवायांमध्ये 44 शीर्ष दहशतवादी आणि 20 परदेशी यांच्यासह एकूण 182 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या 100व्या यशस्वी दहशतवादविरोधी कारवाईच्या एका दिवसानंतर, जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक (डीजीपी) सिंग यांनी एकूण दहशतवाद्यांच्या मृत्यूची माहिती दिली.