Jammu Kashmir : आईचं औषध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 08:08 AM2018-07-06T08:08:13+5:302018-07-06T08:51:06+5:30

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Jammu Kashmir: abducted police constable javaid ahamd dar has been killed body found in kulgam | Jammu Kashmir : आईचं औषध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या

Jammu Kashmir : आईचं औषध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जावेद अहमद डार असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम येथे आढळून आला. दहशतवाद्यांनी कचदूरा परिसरातून त्यांचे अपहरण केले. मेडिकलमध्ये आईसाठी औषध आणण्यासाठी गेलेले असताना जावेद यांचे अपहरण करण्यात आले. गुरुवारी (5जुलै) संध्याकाळी ही घटना आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून तीन ते चार शस्त्रास्त्रधारी दहशतवादी आले. त्यांनी हवेत गोळीबार केला व त्यानंतर जावेद यांच्यावर बंदूक रोखत त्यांनाही स्वतःसोबत घेऊन गेले. जावेद यांचे अपहरण करुन हत्या केल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेनं स्वीकारली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांचेही अपहरण करुन हत्या केली होती. जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमधील रहिवासी असलेले  जवान औरंगजेब 23 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. सुट्टीसाठी ते घरी आले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर 14 जूनला पुलवामा जिल्ह्यातील गुसु गावात त्यांचा मृतदेह सापडला. 

दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. सुरक्षा दलाविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या परिसराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  





 

Web Title: Jammu Kashmir: abducted police constable javaid ahamd dar has been killed body found in kulgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.