अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:14 PM2024-10-22T16:14:51+5:302024-10-22T16:15:44+5:30
Omar Abdullah News: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली होती. मात्र निकाल लागल्यापासून ओमर अब्दुल्ला हे केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडत आहेत.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर उमर अब्दुल्ला यांचे सूर हे सातत्याने बदलत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली होती. मात्र निकाल लागल्यापासून ओमर अब्दुल्ला हे केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडत आहेत.
ओमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्हाला केंद्र सरकारसोबत मतभेद निर्माण करायचे नाही आहेत, असे सांगितले होते. त्यानंतर आता जम्मू काश्मीर विधानसभेमधील विधानसभेचं उपाध्यक्षपद भाजपाला दिलं आहे. त्यामुळे आता भाजपाला विधानसभा उपाध्यक्षपद देऊन उमर अब्दुल्ला यांनी मैत्रीचा मार्ग मोकळा केला आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
उमर अब्दुल्ला यांनी विधानसभेचं उपाध्यक्षपद भाजपाला देण्याचा घेतलेला निर्णय हा अब्दुल्ला आणि भाजपा यांच्यातील मैत्रीचा नवा मार्ग असल्याचं बोललं जात आहे. तर उमर अब्दुल्ला यांनी सुरुवातीला काँग्रेसला राज्य सरकारमध्ये स्थान दिलं नव्हतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नॅशनल कॉफ्रन्स आणि काँग्रेसच्या संबंधात आलेला दुरावा म्हणूनही लोक याकडे पाहत आहेत. पण काही तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे. भाजपाशी वैरही नको आणि मैत्रीही नको, असं धोरण अब्दुल्ला राबवत असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.