मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:53 PM2023-11-15T13:53:49+5:302023-11-15T14:50:20+5:30
प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. पोलिस नियंत्रण कक्ष डोडा येथील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "किश्तवाडहून जम्मूला जाणारी एक प्रवासी बस डोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रंगलजवळ 250 मीटर खोल दरीत कोसळली. या घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती आहे."
दुसरीकडे, या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, आता मृतांचा आकडा वाढला आहे. तसेच, जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात किश्तवाड आणि जीएमसी डोडा येथे हलवण्यात येत आहे. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेची व्यवस्था करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली जात आहे. आपण सतत संपर्कात आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
Union Minister Jitendra Singh tweets, "Just now spoke to DC Doda, J&K, Harvinder Singh after receiving information about the bus accident in Assar region. Unfortunately 5 are dead. Injured being shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda as per requirement. Helicopter… pic.twitter.com/ThxhDjc4CZ
— ANI (@ANI) November 15, 2023