जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:19 AM2017-08-04T08:19:53+5:302017-08-04T10:59:33+5:30
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) सकाळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चमकम सुरू होती. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
श्रीनगर, दि. 4 - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार मारला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. ठार करण्यात आलेला दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.
यानंतर एन्काऊंटरमध्ये बाईकवरील एक जण मारला गेल्याची माहिती समोर आली. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.
दरम्यान, गुरुवारीदेखील ( 3 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मंगळवारी ( 1 ऑगस्ट ) भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.
{{{{twitter_post_id####
Around midnight taking advantage of darkness two terrorists fired & managed to give a slip: J&K Police on Anantnag encounter
— ANI (@ANI_news) August 4, 2017
}}}}J&K: Terrorist killed in an encounter with security forces in Anantnag district
— ANI (@ANI_news) August 3, 2017
भारतीय लष्कराकडून 114 दहशतवाद्यांचा खात्मा
अबू दुजानासहीत दहशतवादी आरिफ लिहारी याचाही मंगळवारी जवानांनी खात्मा केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफ लिहारीचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 वा होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते. विशेष म्हणजे फक्त जुलै महिन्यात जवळपास 22 दहशतवादी ठार झाले आहेत. 2 जुलैपर्यंत एकूण 92 दहशतवादी ठार होते, 31 जुलैपर्यंत हा आकडा 114 वर पोहोचला. 2012 आणि 2013 मधील आकडेवारी पाहता 2017 मधील आकडा खूपच वाढला आहे. 2012 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 72 आणि 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर आकडेवारीमध्ये सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवादी ठार झाले होते. 'दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मोकळे हात दिले असून तसेच राजकीय पाठिंबा मिळत असल्याने सुरक्षा जवानांना गतवर्षी असलेला 150 चा आकडा पार करण्यात यश मिळेल', असे गृहमंत्रालयाशी संबंधित एका अधिका-याने सांगितले आहे.
अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबू दुजाना आणि त्याच्या साथीदाराचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगले यश मिळत आहे. सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे.
गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार काश्मीरसंबंधी मुख्य तीन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, ज्यामध्ये जर का दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास नकार देत असेल तर त्यांना ठार करण्यात येत आहे. चकमक होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांकडून निदर्शन होत असलं तरी त्याचा काहीच प्रभाव सुरक्षा जवानांवर होत नाही. सोबतच टेरर फंडिंगशी संबंधित हुर्रियत फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, स्थानिक लोकांसोबत शक्य तितकी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल ज्यामुळे त्यांना आपण पीडित असल्याचं भासू नये. येणा-या दिवसांमध्ये सुरक्षा जवान आपली ही भूमिका कायम ठेवतील असं एका अधिका-याने सांगितलं आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे दहशतवाद्यांवरील दबाव अजून वाढेल. याशिवाय अन्य मोठे दहशतवादी ज्यामध्ये अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांचा समावेश आहे, त्यांना ठार करण्यासाठी लष्कराकडे प्लान तयार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्थानिक सूत्रांकडून मिळणारी माहिती आणि सुरक्षा जवानांमध्ये होणारा योग्य सुसंवाद यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारला आहे.