बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:16 PM2019-01-24T12:16:25+5:302019-01-24T12:57:55+5:30
सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे.
श्रीनगर - सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे.
जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,'बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीमध्ये बारामुल्लामध्ये एकही जिवंत दहशतवादी नाहीय.'
भारतीय लष्कराने चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडील तीन एके-47 रायफल्सही जप्त केल्या. या दहशतावाद्यांवर ग्रेनेड हल्ला आणि तीन स्थानिक युवकांच्या हत्येचाही आरोप होता.
बारामुल्ला जिल्ह्यावर दहशतवादाचा होता प्रभाव
बारामुल्ला जिल्ह्यावर फार दीर्घ काळापासून दहशतवादाचा प्रभाव होता. बारामुल्लातील सोपोर परिसरात यापूर्वीही कित्येकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या आहेत. ऑपरेशन ऑल आउटदरम्यानही भारतीय लष्कराने बारामुल्लातील वेगवेगळ्या गावांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
बारामुल्ला हल्ल्यानंतरच सर्जिकल स्ट्राइकची कारवाई
2016 मध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 16 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्टाइकची कारवाई केली होती.