वादग्रस्त विधानामुळे मुफ्ती यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 08:31 AM2017-07-31T08:31:44+5:302017-07-31T08:35:09+5:30
मेहबूबा मुफ्ती यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका करत मूफ्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
श्रीनगर, दि. 31- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याला सर्वच स्तरातून विरोध होतो आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने टीका करत मूफ्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी जनतेच्या भावना दुखावल्याचं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जातं आहे.
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण त्याच्यासाठी अनेकांनी मोठं बलिदान दिलं असून त्याच्याशी राष्ट्राचा सन्मान जोडला गेला आहे. मेहबूबा यांच्या बोलण्याचा संदर्भ कोणताही असला तरी त्यांना राष्ट्रध्वजाच्या बाबतीत असं उदाहरण देण्याचा अधिकार त्यांना नाही, असं काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर राज्य शाखेचे प्रवक्ते रवींदर शर्मा म्हणाले आहेत.
काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती?
काश्मिरी जनतेला विशेषाधिकार देणाऱ्या घटनेतील कलम ३५ (अ) मध्ये हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील, तिरंग्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरात कोणीही नसेल, असा इशारा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिला आहे. घटनेच्या ३५ (अ) कलमान्वये जम्मू-काश्मीरचे ‘कायम निवासी’ कोण, हे ठरविण्याचा हक्क राज्याच्या विधानसभेला आहे, तसेच या कायम निवासी नागरिकांना विशेष हक्क आहेत. मेहबुबा यांनी घटनेतील या कलमाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, यात बदल केल्यास जम्मू-काश्मिरात तिरंगा फडकणार नाही. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जीवित धोक्यात येईल. हे कार्यकर्तेच ठामपणे काश्मिरात राष्ट्रध्वज फडकावतात.
- या कलमातील हस्तक्षेप अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा खेळ्या करून तुम्ही भारताचा स्वीकार करणाऱ्या शक्तींनाच कमजोर करीत आहात. ‘वुई द सिटिझन्स’ नावाच्या एका स्वयंसेवी संघटनेने घटनेतील ३५ (अ) कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे कलम संसदेसमोर मांडण्यातच आलेले नाही. राष्ट्रपतींच्या आदेशाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यामुळे ते रद्द करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत आहे.
‘पीओके’मध्ये विधानसभा अधिवेशन
मेहबूबा म्हणाल्या की, आमच्या विधानसभेत तिकडच्या काश्मीरसाठी (पाकव्याप्त) काही जागा राखीव आहेत. या जागांवर नेमणुका व्हायला हव्यात. आपल्या विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन या काश्मिरात (भारतातील काश्मिरात) आणि एकदा त्या काश्मिरात (पाकिस्तानातील) व्हायला हवे. त्यामुळे आपण पर्यटन, प्रवास खुले करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करू शकू.
नियंत्रण रेषेवरून व्यापार हवा
विशाल रॅलीला संबोधित करताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवरील व्यापारी मार्ग बंद करण्याची परवानगी पीडीपी कधीच देणार नाही. याउलट पाकव्याप्त काश्मीरशी अधिकाधिक व्यापार वाढावा, यासाठी आणखी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. वाघा सीमेवरून चरस आणि गांजाची तस्करी होत असते, तरीही हा मार्ग बंद केला गेला नाही, याचा त्यांनी या संदर्भात उल्लेख केला.