ओमर अब्दुल्लांचे मोठी राजकीय खेळी; जम्मूतील हिंदू आमदाराला बनवले उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:47 PM2024-10-16T14:47:25+5:302024-10-16T14:50:33+5:30
Jammu-Kashmir Election 2024 : ओमर अब्दुल्लांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळात त्यांनी दोन हिंदू मंत्र्यांचा समावेश केला आहे.
Jammu-Kashmir Election 2024 : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय इतर पाच आमदारांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, या पाच मंत्र्यांच्या यादीत जम्मू प्रदेशातील दोन हिंदू मंत्र्यांचा समावेश आहे. ओमर सरकारमध्ये सुरेंद्र चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. सुरेंद्र चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवून ओमर अब्दुल्ला यांनी राज्यात हिंदुंमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | Omar Abdullah takes oath as the Chief Minister of Jammu and Kashmir.
— ANI (@ANI) October 16, 2024
The leaders from INDIA bloc including Lok Sabha LoP Rahul Gandhi, Congress leader Priyanka Gandhi Vadra, JKNC chief Farooq Abdullah, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, PDP chief Mehbooba Mufti, AAP… pic.twitter.com/IA2ttvCwEJ
काश्मीर खोरे अन् जम्मू प्रदेशात पॉवर बॅलेन्सचा प्रयत्न
एके काळी जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक भागात नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव होता. पण, हळुहळू पक्षाचा राज्यातील प्रभाव कमी होत गेला आणि तो फक्त काश्मीर खोऱ्यापुरता मर्यादित राहिला. नॅशनल कॉन्फरन्सवर सतत सत्तेत असताना जम्मू प्रदेशाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतो. पण, आता ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठीच त्यांनी जम्मू भागातून निवडून येणाऱ्या सुरिंदर सिंग चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे.
#WATCH | Srinagar | After taking oath as Jammu & Kashmir Deputy CM, Surinder Kumar Choudhary says," I have no words to thank our leaders Farooq Abdullah & Omar Abdullah for giving such a big position. With his decision to make me the Deputy CM, Omar Abdullah has proved that Jammu… pic.twitter.com/iW1Cp2IGsT
— ANI (@ANI) October 16, 2024
हिंदू समाजाला संदेश
सुरिंदर सिंग चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवून नॅशनल कॉन्फरन्सने हिंदू मतदारांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंच्या पलायनानंतर नॅशनल कॉन्फरन्सची हिंदू मतांवरील पकड कमकुवत झाली आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या मजबूत उदयापूर्वी काँग्रेस आणि पँथर्स पक्षासारख्या पक्षांचा प्रभाव होता. फक्त, जम्मू प्रदेशातील राजौरी, पूंछ, डोडा, किश्तवाड आणि रामबन, मुस्लिमबहुल मतदारसंघातच नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव होता. पण, आता नॅशनल कॉन्फरन्सने ओमर मंत्रिमंडळात जम्मू विभागातील दोन मंत्र्यांना स्थान दिले असून सुरेंद्र चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे.
रविंदर रैनांना पराभूत केल्याचे बक्षीस
सुरिंदर सिंह चौधरी विधानसभा निवडणुकीत राजौरी जिल्ह्यातील नौशेरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सुरेंद्र चौधरी यांनी नौशेरा मतदारसंघातून जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रविंदर रैना यांचा पराभव केला. सुरिंदर सिंग चौधरी यांना राज्यातील भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याला पराभूत केल्याचे बक्षीस उपमुख्यमंत्रीपदाच्या रूपाने मिळाले आहे. 2014 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नौशेरातून रविंदर रैना जिंकले होते.
NC leaders Sakina Itoo, Javed Ahmed Rana, Javed Ahmad Dar and Independent MLA Satish Sharma took oath as cabinet ministers of Jammu and Kashmir pic.twitter.com/xGDQK73B8z
— ANI (@ANI) October 16, 2024
मंत्रिमंडळात या नेत्यांचा समावेश
छांब मतदारसंघातील अपक्ष आमदार सतीश शर्मा यांनाही ओमर अब्दुल्ला मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले आहे. छंब विधानसभेची जागाही जम्मू जिल्ह्यात येते. जम्मू जिल्ह्यात विधानसभेच्या 11 जागा असून त्यापैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जम्मू जिल्ह्यातील एकमेव बिगरभाजप आमदाराला मंत्री बनवण्यामागे ओमर अब्दुल्ला यांची राजकीय पायाभरणी करण्याची रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. ओमर अब्दुल्ला मंत्रिमंडळातील इतर चेहऱ्यांमध्ये सकीना येट्टू, जावेद दार आणि जावेद राणा यांचा समावेश आहे.