मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीची राजकारणात एंट्री; PDP ने जाहीर केली 8 उमेदवारांची पहिली यादी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 07:52 PM2024-08-19T19:52:22+5:302024-08-19T19:52:49+5:30
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुलीला विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
Jammu-Kashmir Election : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी आता सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली असून, या यादीत मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचेही नाव आहे. इल्तिजाची ही पहिलीच निवडणूक असून, तिला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून तिकीट देण्यात आले आहे.
मेहबुबा यांनी राजकीय वारसा मुलीकडे सोपवला
मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. मेहबुबा यांनी यंदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला असून, आता त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे, इल्तिजा मुफ्ती यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्या बऱ्याच काळापासून पक्षप्रमुखांच्या मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहेत.
PDP च्या 8 उमेदवारांची नावे जाहीर
- अनंतनाग पूर्व - अब्दुल रहमान वीरी
- देवसर - सरताज अहमद मदनी
- अनंतनाग - डॉ.मेहबूब बेग
- चरार-ए-शरीफ - नबी लोन हंजुरा
- बिजबेहरा - इल्तिजा मुफ्ती
- वाची - जी.मोहिउद्दीन वाणी
- पुलवामा - वाहीद-उर-रहमान पारा
- त्राल - रफिक अहमद नाईक
पीडीपीचे सरचिटणीस गुलाम नबी लोन हंजुरा यांनी ही यादी जाहीर केली आहे.
कोण आहे इल्तिजा मुफ्ती?
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (37) आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि युनायटेड किंगडमच्या वारविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेव्हा इल्तिजा यांना मीडिया सल्लागार म्हणून नेमण्यात आले.