जम्मू काश्मीर : त्रालमध्ये भारतीय लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक, 1 जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 12:35 PM2018-04-24T12:35:20+5:302018-04-24T12:42:00+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचे वृत्तदेखील समोर आले आहे. पुलवामामधील त्राल परिसरातील लाम गावामध्ये मंगळवारी (24 एप्रिल) सकाळपासून गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. परिसरात सध्या चकमक सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांची नेमकी संख्या अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.
11 दहशतवाद्यांचा खात्मा
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनाग आणि शोपियनमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती.
#UPDATE: One Army jawan injured in an encounter with terrorists in Lam village of Tral in Pulwama district. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) April 24, 2018