जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 22:12 IST2024-06-26T22:07:59+5:302024-06-26T22:12:42+5:30
Jammu-Kashmir Encounter : मोठ्या प्रमाणात शस्त्रास्रे आणि दारुगोळा जप्त.

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात बुधवारी(दि.26) अनेक तास चाललेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ठार झालेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात 11 आणि 12 जून रोजी झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल संयुक्त शोधमोहिम राबवत होते. या शोध मोहिमेदरम्यान बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास डोडा जिल्ह्यातील गंडोह परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
अनेक तास चाललेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. याच दहशतवाद्यांनी 11 जून रोजी डोडा येथील चेकपोस्टवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले होते. याशिवाय, 12 जून रोजी गंडोह भागातील कोटा टॉप येथे झालेल्या चकमकीत एक पोलीस जखमी झाला होता. या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते.