भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:53 IST2023-10-26T19:52:56+5:302023-10-26T19:53:06+5:30
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये ही चकमक झाली.

भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न; लष्कर-ए-तैयबाचे 5 दहशतवादी ठार
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये गुरुवारी (26 ऑक्टोबर) सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सकाळी लष्करासोबत संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारततीय सैनिकांनी गोळीबार केला.
सुरुवातीला दोन घुसखोर मारले गेले, यानंतर 6 तास चाललेल्या चकमकीत आणखी 3 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. सध्या या भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे. आणखी काही दहशतवादी लपले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे.