जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 06:52 PM2024-07-18T18:52:32+5:302024-07-18T18:52:58+5:30
Jammu-Kashmir Encounter : आज सकाळपासून जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमकीची घटना घडली आहे.
Jammu-Kashmir Encounter : जम्मूतील डोडानंतर आता उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. कुपवाडा अंतर्गत येणाऱ्या नियंत्रण रेषेजवळ केरन सेक्टरमध्ये ही घटना घडली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारतीय लष्कराने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.
OP RAJBIR, KERAN #Kupwara
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) July 18, 2024
An Infiltration attempt has been successfully prevented with the elimination of two terrorists today on #LoC in Keran Sector, #Kupwara.
Anti Infiltration Operations are continuing #Kashmir@adgpi@NorthernComd_IApic.twitter.com/77xdqYMza1
दोडा येथे दोन जवान जखमी
यापूर्वी आजच जम्मूच्या डोडा अंतर्गत येणाऱ्या कास्तीगडमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. या घटनेनंतर जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. जखमी जवानांना उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डोडा चकमकीत पाच जवान शहीद
सोमवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह 5 जवानांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डोडा शहरापासून 55 किमी अंतरावर असलेल्या जंगलात मोहिम सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला, सैन्याच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर सैनिकांनीही घनदाट जंगलातून त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास जंगलात आणखी एक चकमक झाली. या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, ज्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शहीद झालेल्या जवानांमध्ये लष्कराचा एक अधिकारी, तीन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश आहे.
मोदी-शाह-राजनाथ यांची हायलेव्हल बैठक
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज(दि.18) राजधानी दिल्लीत कॅबिनेट सुरक्षा व्यवहार समिती, म्हणजेच CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एक तास चाललेल्या या बैठकीत जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ले आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. सरकार या दहशतवाद्यांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.