जम्मू काश्मीर - राष्ट्रगीत चालू असतानाही अधिकारी उभा राहिला नाही, विरोध केला असता विद्यार्थ्यांनाच मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 03:31 PM2017-10-13T15:31:19+5:302017-10-13T15:36:58+5:30
आतापर्यंत राष्ट्रगीताचा आदर न करणा-यांना मारहाण झाल्याची किंवा त्यांच्याविरोधात कारवाई झाल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे राष्ट्रगीतावेळी उभे का राहिला नाहीत याचा जाब विचारला म्हणून विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
श्रीनगर - आतापर्यंत राष्ट्रगीताचा आदर न करणा-यांना मारहाण झाल्याची किंवा त्यांच्याविरोधात कारवाई झाल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे राष्ट्रगीतावेळी उभे का राहिला नाहीत याचा जाब विचारला म्हणून विद्यार्थ्यांवरच लाठीचार्ज करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. झालं असं की, महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त मुख्य पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक शाळेच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रमाच्या सुरुवातील राष्ट्रगीत लावण्यात आलं तेव्हा सहाय्यक आयुक्त आपल्या सुरक्षारक्षकांसोबत तिथे प्रवेश करत होते. राष्ट्रगीत सुरु असतानाही अधिकारी आणि त्यांचे सुरक्षारक्षक यांनी आपलं चालणं सुरु ठेवलं. त्यावेळी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपण आहोत त्या जागी त्यांनी थांबणं अपेक्षित होतं.
12 ऑक्टोबरची ही घटना आहे. विद्यार्थांनी सहाय्यक आयुक्तांनी राष्ट्रगीताचा सन्मान न केल्याने विरोध दर्शवला. यानतंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत, जबरदस्त मारहाण केली.
विद्यार्थ्यांनी शुक्रवारीदेखील या घटनेच्या निषेधार्थ किश्तवाड जिल्हा मुख्यालयासमोर निदर्शन केलं आणि अधिका-याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण चिघळत असल्याचं लक्षात येताच उपायुक्तांनी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिला. सोबतच एका वरिष्ट अधिका-यावर चौकशीची जबाबदारी सोपवली. दुसरीकडे, हजारो विद्यार्थी अधिका-याने माफी मागावी अशी मागणी करत आहेत.
महत्वाचं म्हणजे गतवर्षी डिसेंबर महिन्यात सर्वोच्च नयायालयाने आदेश दिला होता की, देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे. तसेच राष्ट्रगीत सुरू असताना सिनेमागृहांत पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सिनेमागृहांतील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. चित्रपटात गरजेशिवाय राष्ट्रगीत वापरलं जाऊ नये हेदेखील न्यायालयाने सांगितलं होतं.