“हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा”; लोकसभेत बोलताना फारुक अब्दुल्ला आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:20 PM2023-08-09T17:20:27+5:302023-08-09T17:22:51+5:30
Parliament No-confidence Motion Debate: तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? अशी विचारणा करत फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.
Parliament No-confidence Motion Debate: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर दुसऱ्या दिवशी चर्चा केली जात आहे. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर लोकसभेत येत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला अविश्वास ठरावावर बोलताना चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा, असे सांगत फारूक अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केला.
केंद्रातील सरकार काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याचा दावा करत आहे, मात्र, तेथील परिस्थिती काही वेगळीच आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत अब्दुल्ला म्हणाले की, हवे तर माझे काही ऐकू नका. मात्र, तुमच्या नेत्यांनी काय सांगितले, ते तरी ऐका. मित्र बदलता येतात, शेजारी बदलता येत नाहीत, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. जर आपण आपल्या शेजाऱ्याशी मैत्रीने राहिलो तर दोघांची प्रगती होईल. केवळ शत्रूत्व पत्करल्यास प्रगती कमी होईल, याची आठवण फारूक अब्दुल्ला यांनी करून दिली.
मणिपूरमध्ये प्रेमाने काम करावे लागेल
तुमचा विश्वास असो वा नसो, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याशी युद्ध करा. तुम्हाला कोणीही अडवलेले नाही. आम्ही तर कधीच थांबवलेले नाही, असे सांगताना, आम्ही पाकिस्तानी असल्याचा संशय आमच्यावर घेऊ नका. किती दिवस हा संशय घेणार आहात? असा संशय घेणे आता बंद करा आणि आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. आम्ही या देशासोबत होतो आणि या देशासोबतच कायम उभे राहू, असा विश्वास फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. तसेच हा देश जगावा आणि वाढावा, यासाठी आम्हीही गोळ्या झेलल्या आहेत. आम्हीही त्याग केला आहे. हे कधीही विसरू नका. तसेच जोपर्यंत मणिपूरचा संबंध आहे, तिथेही आपल्याला प्रेमाने काम करावे लागेल. त्यांची मने जिंकून त्यांना वाचवावे लागेल, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतायत
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या देशाची जबाबदारी आहे. केवळ हिंदूंचीच नव्हे तर या देशात राहणारे मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख यांचीही जबाबदारी आहे. पंतप्रधान भारताचे नेतृत्व करतात. १४० कोटी लोकांचे नेतृत्व करतात. आपण सर्व चुका करतो. आम्ही काश्मिरी हिंदूंना परत आणण्याचाही प्रयत्न केला. तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? एकही नाही, अशी टीकाही फारूक अब्दुल्ला यांनी केली.
दरम्यान, याला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भारताकडे एवढी मोठी शक्ती आहे, कोणताही शेजारी आमच्याशी लढण्याची हिंमत करू शकत नाही. संपूर्ण हिंदुस्थानी जनतेला पंतप्रधान मोदी आणि देशाचा अभिमान आहे, असे राय यांनी सांगितले.