Amit Shah : "सत्यपाल मलिकांची वक्तव्य राजकीय," काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? अमित शाह म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:20 PM2023-05-04T23:20:54+5:302023-05-04T23:21:31+5:30
कर्नाटकात बहुमतापेक्षाही अधिक जागा जिंकू, अमित शाहंनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सत्यपाल मलिक यांच्यावर पलटवार केलाय. सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असतानाच या गोष्टी सांगायला हव्या होत्या. परंतु निवडणुकीच्या वेळी या गोष्टी समोर यायला लागल्यात, यावरून ही राजकीय वक्तव्य आहेत हे स्पष्ट होत असल्याचं अमित शाह म्हणाले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
यावेळी त्यांना जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. “हे मी सांगू शकत नाही. हे काम निवडणूक आयोगाचं आहे. आता मतदार यादी तयार केली जात आहे. यामध्ये काही हरकती घेण्यात आल्यात. काश्मिरी विस्थापितांच्या नावांची नोंद झालेली नाही. याची पडताळणी करून जोपर्यंत त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोवर मतदार यादी बनणार नाही असं मला वाटतं. जेव्हा निवडणूक आयोगाला ही यादी तयार आहे असं वाचेल, तेव्हा ते निवडणुका घेतील,” असं अमित शाह म्हणाले. ‘हिंदुस्तान’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.
कर्नाटकातील निकाल अवाक् करणारे असतील
“मी वैयक्तिकरित्या कर्नाटकातील ७० टक्के जिल्ह्यांमध्ये गेलो आणि सर्वत्र भारतीय जनता पक्षाच्या बाजूने उत्साह दिसून आला. आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड आहे आणि यावेळी आम्हाला बहुमताच्या आकड्यापेक्षा किमान १५ जागा नक्कीच जास्त मिळतील. दक्षिणेतील भारतीय जनता पक्षाचा प्रमुख बालेकिल्ला म्हणून कर्नाटकच्या रुपात स्थापण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पक्षाचे लोक कामाला लागले आहेत. कर्नाटकचे निकाल नक्कीच अवाक् करणारे असतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुस्लिम आरक्षण का संपवलं?
“हे संपवण्यासाठी उशिर झाला हे सांगण्यास मला संकोच वाटत नाही. धार्मिक आधारावरील आरक्षण संविधानानुसार नाही. ते संपवलं पाहिजे हे मी यापूर्वीही म्हटलं होतं. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास आपलं संविधान मान्यता देत नाही. अनुसूचित जाती, जमाती किंवा मागासलेपणानुसार आरक्षण दिलं जाऊ शकतं, ज्याची व्याख्या संविधानानं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांनी हे स्पष्टही केलंय,” असं शाह यांनी नमूद केलं. संविधान धर्माच्या आधारे आरक्षणाला मान्यता देत नाही, म्हणूनच आमचं सरकार ज्या ठिकाणी बनेल, तिकडे धर्माच्या आधारे सुरू असलेलं आरक्षण बंद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.