Jammu-Kashmir: सांबामध्ये दिसले चार पाकिस्तानी ड्रोन, बडगाममध्ये आढळला संशयित टिफिन बॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:37 PM2021-08-02T12:37:01+5:302021-08-02T12:46:11+5:30
Jammu-Kashmir:चार दिवसांपूर्वीही सांबामध्ये तीन विविध ठिकाणी ड्रोन दिसले होते.
सांबा: जम्मू-काश्मीरातील सांबा परिसरात काल(दि.1)रात्री चार ठिकाणी संशयित ड्रोन आढळून आले. सांबाचे एसएसपी राजेश शर्मा यांनी सांगितलं की, सांबातील बारी ब्राह्मणा परिसरात संशयित ड्रोन फिरत असल्याची सूचना मिळाली होती. यापूर्वी चार दिवसांपूर्वीही सांबामध्ये तीन विविध ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एकाचवेळी हे ड्रोन दिसले. एका आठवड्यापूर्वी पोलिसांनी येथील सीमाभाग असलेल्या कनचक परिसरात पाच किलो आयईडी घेऊन जाणारा पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानकडे जाणाऱ्या एका ड्रोनवर चिलाद्या परिसरात गोळ्या चालवल्या. तर, ब्राह्मणा आणि गगवालमध्येही जम्मू-पठानकोट राजमार्गावर संवेदनशील ठिकाणांवर फिरल्यानंतर ड्रोन आकाशात बेपत्ता झाले. सध्या पोलिस आणि बीएसएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
बडगाम जिह्यात आढळला संशयित टिफिन बॉक्स
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मागममध्ये सोमवारी एक संशयित टिफिन बॉक्स मिळाला आहे. सूचना मिळाल्यानंतर बॉम्बनिरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु, सुदैवाने त्या टिफीन बॉक्समध्ये काहीच सापडलं नाही. यापूर्वी मागच्या महिन्यात 16 जुलैला जम्मू-राजौरी-पुंछ राष्ट्रीय राजमार्गावर पुंछच्या भींबर परिसरता एक संशयित बॅग आढळली होती.