पाटण्याच्या तुलतेन काश्मीर सुरक्षितच; राज्यपालांकडून अजब तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 05:46 PM2019-01-07T17:46:07+5:302019-01-07T17:50:04+5:30
पाटण्यातील कायदा सुव्यवस्थेवर जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी ठेवलं बोट
लखनऊ: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सामान्य आहे. या भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतंही हत्याकांड घडलेलं नाही, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. काश्मीरमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सांगताना त्यांनी तिथल्या परिस्थितीशी तुलना पाटण्याशी केली. पाटण्यात जितके खून दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये एका आठवड्यात होतात, असा अजब दावा मलिक यांनी केला. या दाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला सत्यपाल मलिक उपस्थित होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सर्वसामान्य असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांसारखीच आहे. तिथं कोणतंही हत्याकांड झालेलं नाही. जितक्या हत्या पाटण्यात दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये आठवड्यात होतात. काश्मीरमध्ये आता दगडफेकीच्या घटना घडत नाहीत. दहशतवादी संघटनांमधील भरतीदेखील थांबली आहे,' असं मलिक म्हणाले.
J & K Governor. Satya Pal Malik: Jammu & Kashmir is just like others, there’s no massacre going on at this time. The number of murders witnessed in Patna in a single day is equal to deaths in Kashmir in a week. Stone pelting and recruitment to terrorist groups has stopped. pic.twitter.com/UszzYv5Cqy
— ANI (@ANI) January 7, 2019
जम्मू-काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगताना सत्यपाल मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारीचा संदर्भ दिला. सत्यपाल मलिक यांची नियुक्ती मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाटण्यात संयुक्त जनता दलासह भाजपा सत्तेत आहे. मलिक यांनी पाटण्यातील गुन्हेगारी जास्त असल्याचा दावा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विधानातून केला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सत्तेत असलेला भाजप आणि जेडीयू यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.