पाकव्याप्त काश्मीर अन् अक्साई चीन भारताचाच भाग, सरकारनं लवकर निर्णय घ्यावा- बिपीन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:53 PM2019-07-26T12:53:49+5:302019-07-26T12:54:30+5:30
कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.
नवी दिल्लीः कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर आणि अक्साई चीनच्या ताब्यावर राजकीय नेतृत्वानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अक्साई चीनचा जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो परत कशा मिळवता येईल, याचा राजकीय नेतृत्वानं विचार करावा. यासाठी कूटनीतीचा मार्ग अवलंबवावा किंवा इतर कोणताही मार्ग, पण तो भाग परत भारतात आणा, अशी सूचनाच बिपीन रावत यांनी केली आहे.
लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी कारगिल विजय दिवसाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं द्रासमध्ये कारगिल वॉर मेमोरियलवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी बंदुकधाऱ्या काश्मिरी तरुणांनाही इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये जर तुम्ही सेनेविरोधात बंदूक वापरली, तर तुम्ही कब्रस्थानात जाल आणि तुमची बंदूक आमच्याकडे येईल. काश्मिरी तरुणांनी चांगला मार्ग अवलंबवावा आणि रोजगाराच्या दृष्टीनं पुढची पावलं उचलावीत.
काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला शुक्रवारी २0 वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या आदल्याच दिवशी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला ठणकावले. पुन्हा ‘कारगिल’सारखी घुसखोरी करण्याची हिम्मत करू नका, असा सज्जड दम रावत यांनी पाकिस्तानला भरला होता. या युद्धाला शुक्रवारी 20 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभर ‘ऑपरेशन विजय’चा वर्धापन दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होणार आहे. भारताच्या हद्दीतून पाकच्या प्रत्येक जवानाला हाकलून देण्यात भारतीय जवानांना 26 जुलै रोजी यश आले. त्यामुळेच विजय दिनाचे महत्त्व आहे.