'जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार...', कठुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:39 PM2024-07-09T15:39:48+5:302024-07-09T15:40:58+5:30
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले.
Jammu-Kashmir Kathua Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवार, 8 जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. 'आमच्या पाच जवानांच्या हत्येचा बदला घेणार आणि या दुष्ट शक्तींचा नाश करणार,' असा इशारा संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिला.
"Their selfless service to the nation will always be remembered & their sacrifice will not go unavenged and India will defeat the evil forces behind the attack".
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) July 9, 2024
-Defence Secretary Shri @giridhararamane (2/2)@HQ_IDS_India@adgpi@PIB_India@GallantryAward@salute2soldier
दहशतवाद्यांना इशारा
संरक्षण सचिवांनी म्हटले की, 'कठुआ जिल्ह्यातील बडनोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर जवानांना वीरमरण आले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. त्यांनी देशासाठी केलेली निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल. भारत या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींचा नक्की नाश करेल.' संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जवानांच्या बलिदानाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
I am deeply anguished at the loss of five of our brave Indian Army Soldiers in a terrorist attack in Badnota, Kathua (J&K).
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 9, 2024
My deepest condolences to the bereaved families, the Nation stands firm with them in this difficult time. The Counter Terrorist operations are underway,…
दहशतवाद्यांनी हल्ला कसा केला?
लष्कराचे वाहन कठुआच्या बडनोटा येथील डोंगराळ भागात गस्तीसाठी निघाले होते. एका बाजूला दरी असल्याने वाहनाचा वेगही कमी होता, त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. यावेळी टेकडीवर घात लावून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक वाहनावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र सर्व दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या घटनेत एका अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद झाले, तर इथर 5 जखमी जवानांवर पठाणकोट मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.