Jammu-Kashmir: लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 07:44 PM2022-07-03T19:44:04+5:302022-07-03T19:44:34+5:30
अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता.
श्रीनगर: जम्मू पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी लष्करच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक केली आहे. तालिब हुसैन शाह असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता. रविवारी सकाळी तालिब हुसेन शाह आणि त्याच्या साथीदारांना रियासी परिसरात ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल, अनेक ग्रेनेड आणि इतर अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडल्या आहेत.
Hats off to the courage of villagers of Tuksan, in #Reasi district . Two #terrorists of LeT apprehended by villagers with weapons; 2AK #rifles, 7 #Grenades and a #Pistol. DGP announces #reward of Rs 2 lakhs for villagers. pic.twitter.com/iPXcmHtV5P
— ADGP Jammu (@igpjmu) July 3, 2022
पक्ष नेतृत्वाला मारण्याचा कट
याबाबत भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले की, हे ऑनलाइन सदस्यत्व घेतल्यामुळे झाले आहे. ऑनलाइन सदस्यत्व घेताना पार्श्वभूमी तपासली जात नाही. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर हा मोठा मुद्दा समोर आला आहे. मी म्हणेन की हे एक नवीन मॉडेल आहे, ज्याच्या अंतर्गत कोणीही भाजपमध्ये प्रवेश करतो आणि पक्षाची रेकी करतो. अशा प्रकारे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मारण्याचा दहशतवादी कट रचला जात आहे. मात्र, कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली, ही दिलासादायक बाब आहे.
1) Faizal Ahmed Dar S/O Bashir Ahmed Dar r/o Pulwama and a categorised terrorist and 2) Talib Hussain S/O Haider Shah R/O Rajauri.
— ADGP Jammu (@igpjmu) July 3, 2022
ऑनलाइनमुळे भाजपात आला
ते पुढे म्हणाले की, सीमेवर अनेक लोक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ऑनलाइन सदस्यत्वामुळे आता कोणीही भाजपचा सदस्य होऊ शकतो. या प्रक्रियेचा सर्वात मोठा दोष म्हणजे सदस्यत्व घेण्यापूर्वी तुम्ही कोणाचीही पार्श्वभूमी तपासू शकत नाही. तसेच त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात नाही. या वर्षी 9 मे रोजी भाजपने अटक केलेला दहशतवादी शाह याला जम्मू क्षेत्राचा आयटी आणि सोशल मीडिया प्रमुख बनवले होते.
भाजप नेत्यांसोबत फोटो
यानंतर दहशतवादी तालिब हुसैन शाहचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटोही समोर आले होते. जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत तालिब हुसैन शाह याचे अनेक फोटो आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि पोलिस प्रमुखांनी दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या गावकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे एडीजी मुकेश सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी गावकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक करतो आणि त्या गावकऱ्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो.