भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:06 PM2023-07-19T19:06:09+5:302023-07-19T19:06:44+5:30
कुपवाडा जिल्ह्यातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न सैन्याने हाणून पाडला.
Jammu Kashmir:जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन घुसखोरांना ठार केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी (19 जुलै) ही माहिती दिली. घुसखोरांकडून 4 एके रायफल, 5 ग्रेनेड आणि युद्धात वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातही मंगळवारी भारतीय सैन्याने चार सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी तीन जण पाकिस्तानचे रहिवासी होते, तर एक पीओकेचा रहिवासी होता. 16 आणि 17 जुलैच्या मध्यरात्रीदेखील सुरक्षा दलाने पूंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला होता.
ऑपरेशन त्रिनेत्र II
राष्ट्रीय रायफल्स सेक्टर सिक्सचे कमांडर ब्रिगेडियर एमपी सिंग यांनी पुंछमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “सध्या सुरू असलेल्या 'ऑपरेशन त्रिनेत्र II' दरम्यान चार परदेशी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अशा मोठ्या सशस्त्र दहशतवाद्यांचे भारतीय क्षेत्रात असणे, म्हणजे हे या प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे दहशतवादी आगामी काळात मोठ्या दहशतवादी घटना घडवू शकतात."
20 एप्रिलच्या घटनेनंतर कारवाई सुरू
20 एप्रिल रोजी पूंछमधील मेंढर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्कराने 'ऑपरेशन त्रिनेत्र' सुरू केले.