Jammu & Kashmir: ‘मोदी है तो सब मुमकिन है’; राजकीय प्रतिमा उजळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:42 AM2019-08-06T02:42:27+5:302019-08-06T02:42:51+5:30
जनतेचा विश्वास ठरविला सार्थ
- संतोष ठाकूर/एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाने पुन्हा एकदा आपली राजकीय प्रतिमा मजबूत केली आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’हा नारा भाजप देत आलेला आहे, तो विश्वास मोदी यांनी सार्थ ठरविला.
असे मानले जाते की, मोदी यांची राजकीय प्रतिमा उजळून निघाली असून विरोधकांच्या तुलनेत ते अधिक विश्वसनीय झाले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी जे निर्णय घेतात त्यांना राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र प्रेम आणि राष्ट्रीय भावनेशी जोडले जाते. त्यामुळे त्यांचे विरोधकही त्यांच्यासमोर असहाय होतात.
पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी काळ्या पैशांवर प्रहार, तीन तलाकविरुद्ध कायदा आणण्यासोबतच कलम ३७० समाप्त करण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी सर्वांना घर देणे, जीएसटीची अंमलबजावणी यासारखे आश्वासनेही दिली होती. मोदी यांनी एकानंतर एक अशा आश्वासनांवर अंमलबजावणी सुरु केली.
मोदी यांनी काळ्या पैशांवर प्रहार करण्याची घोषणा करताना देशात नोटाबंदी केली. लोकांना याचा त्रास झाला. पण, राष्ट्रीय भावनेपुढे याला विरोध करणारे राजकीय पक्ष आणि लोक वेगळे पडले. तसेच, राष्ट्रीय भावनेचा मुद्दा उपस्थित करत देशात जीएसटी लागू केला. यावेळीही याला विरोध करणारे हे देशप्रेमापुढे फिके पडले. त्यानंतर मोदी यांनी तीन तलाकचा मुद्दा उपस्थित करुन देशातील महिलांच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याचे सांगितले. यावरही लोकांचे समर्थन मिळविण्यात ते यशस्वी झाले.
कलम ३७० हटविल्याने मोदी यांची राजकीय प्रतिमा उजळली आहे. या निर्णयापुढे विरोधक स्वत:ला असहाय समजू लागले आहेत. कारण, बसपा, आम आदमी पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपीने या निर्णयाचे समर्थन केले असून पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली आहे.