दहशतवादावर प्रहार; 2021 मध्ये सुरक्षा दलाच्या विविध कारवायांमध्ये 182 दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:20 PM2021-12-31T17:20:14+5:302021-12-31T17:20:28+5:30
या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 134 तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला. त्यापैकी 72 जण ठार झाले तर 22 जणांना अटक करण्यात आली. सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 44 टॉप दहशतवाद्यांचाही खात्मा झाला आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांविरुद्धची कारवाई तीव्र केली आहे. अवघ्या 2-3 दिवसांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये 100 यशस्वी ऑपरेशनमध्ये एकूण 182 दहशतवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये 44 प्रमुख दहशतवाद्यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर डीजीपी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 134 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचेही दिलबाग सिंग यांनी सांगितले. यापैकी 72 जणांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले, तर 22 जणांना अटक करण्यात आली. या वर्षी घुसखोरी कमी झाली आहे. केवळ 34 दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. याशिवाय पंथा चौकात पोलिस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या 9 दहशतवाद्यांना गेल्या 24 तासांत ठार करण्यात आले आहे.
चकमकीत 9 दहशतवादी ठार
श्रीनगरच्या पंथाचौक भागात एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एका जवान जखमी झाला आहे. त्याआधी काश्मीर खोऱ्यातील कुलगाम व अनंतनाग जिल्ह्यांत एकाच वेळी कारवाई करुन सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या सहापैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते, हे उघड झाले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.