जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 10:28 IST2021-12-12T10:28:08+5:302021-12-12T10:28:57+5:30
अवंतीपोरा येथील बरागाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तेथे पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
नवी दिल्ली:जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)मधील अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अवंतीपोराच्या बारागाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि लष्कर तिथे पोहोचले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
यापूर्वी, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद जखमी झाले, त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
8 डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियांच्या चक-ए-चोलन गावात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूंनी दिवसभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. काश्मीर पोलिसांनी सांगितल्यानुसार, अमीर हुसैन, रईस अहमद आणि हसीब युसूफ अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.