सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर अबू जरार चकमकीत ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:42 PM2021-12-14T17:42:31+5:302021-12-14T18:25:49+5:30
अबु जरारने 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.
श्रीनगर: 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. आता त्या हल्ल्याच्या मास्टरमाइंट अबु जरार याला ठार करण्यात सैन्याला यश आले आहे. भारतीय सैन्याने आज झालेल्या चकमकीत अबु जरारचा खात्मा केला. मिळालेल्य माहितीनुसार, अबु जरार लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता.
11 ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल केले असता या सर्व जवानांचा मृत्यू झाला. पाच जवानांच्या हौतात्म्यानंतर, आपल्या साथीदारांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या जवानांवर दोन दिवसांनंतर पुन्हा हल्ला झाला, ज्यात एका जेसीओसह दोन जवान शहीद झाले.
आज झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार
काल जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीस बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर 24 तासांच्या आत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा बदला घेतला. आज पुंछच्या सुरनकोटमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने ही माहिती दिली. दहशतवाद्याकडून एक एके-47 रायफल आणि चार मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत.