Jammu Kashmir News : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून आणखी एक निरपराधाची हत्या; २४ तासांतील दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:16 PM2021-11-08T23:16:01+5:302021-11-08T23:17:13+5:30
Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका दुकानात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा झाला मृत्यू.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची नापाक कारवाई पुन्हा एकदा समोर आली आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारात बोहरी कदल परिसरात दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या एका सेल्समनची गोळी घालून हत्या केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मग इब्राहिम असं असून तो बांदीपुराचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मृत व्यक्ती काश्मीरी पंडित संदीप मावा यांच्याकडे सेल्समनचं काम करत होता. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना मुस्लीम जनबाज फोर्सनं (Muslim Janbaaz Force) घेतली आहे. संदीप मावा आणि त्यांचे वडील हे सरकारी एजन्सींसाठी काम करत होते. तसंच ते मूळ काश्मीरी नसलेल्या लोकांना काश्मीरमध्ये स्थायिक करण्याचे प्रयत्न करत होते, असं दहशतवादी संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
चार गोळ्या लागल्या
७० सालानंतर पंडित रोशन लाल मावा यांनी २०१९ मध्ये काश्मीर खोऱ्यात आपला मसाल्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला होता. जैना कदल येथील प्रसिद्ध व्यवसायिक रोशन लाल मावा यांच्या दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी कथितरित्या ऑक्टोबर १९९०मध्ये हल्ला केला होता. यामध्ये त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. आता सोमवारी त्यांच्या मुलाकडे असलेल्या सेल्समनची हत्या करण्यात आली.
The dastardly killing of Ibrahim is reprehensible & I unreservedly condemn it. Unfortunately Ibrahim is the latest in a series of targeted killings in the valley, especially Srinagar. May Allah grant him place in Jannat. https://t.co/ENuuRTLXgP
— Omar Abdullah (@OmarAbdullah) November 8, 2021
यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच इब्राहिम याची करण्यात आलेल्या हत्येची घटना ही नींदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. यापूर्वी रविवारी श्रीनगरच्या बटमालू क्षेत्रात दहशतवाद्यानं एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. तौसिफ अहमद हे बटमालू येथे PCR च्या पोस्टिंगवर होते. हल्ल्यानंतर त्वरित त्यांना नजीकच्या SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.