जातीय तणाव पसरवण्यासाठी दहशतवाद्यांकडून 'निवडक' नागरिकांची हत्या: डीजीपी दिलबाग सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:23 PM2021-10-07T16:23:01+5:302021-10-07T16:23:35+5:30
'भीतीचे वातावरण निर्माण करुन घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न आहे.'
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणावर राज्याचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. काही ठराविक नागरिकांची हत्या करुन राज्यातील वातावरण खराब करुन जातीय दंगली घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दिलबाग सिंह पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये काही दिवसांपासून नागरिकांना लक्ष्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या आणि कोणाशीही काही संबंध नसलेल्या निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे. भीतीचे वातावरण निर्माण करुन त्या घटनांना जातीय रंग देण्याचा हा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.
These recent incidents of targeting civilians are to create an atmosphere of fear, communal disharmony here. This is a conspiracy to target the local ethos & values & defame local Kashmiri muslims. This is being done on instructions from agencies in Pak: J&K DGP Dilbag Singh pic.twitter.com/HPsDLKZOl5
— ANI (@ANI) October 7, 2021
ते डीजीपी पुढे म्हणाले की, हा हल्ला काश्मीरच्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता. काश्मीर खोर्यातील शांततेच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी पाकिस्तानच्या सूचनेवर दहशतवादी काम करत आहेत. काश्मीरच्या स्थानिक मुस्लिमांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. जे लोक इथे भाकरी कमवण्यासाठी आले आहेत त्यांना लक्ष्य करण्याचे हे षडयंत्र आहे. काश्मीरमधील जातीय सलोखा आणि बंधुभावाच्या जुन्या परंपरेला हानी पोहचवण्याचे हे षडयंत्र आहे.
पाच दिवसात 7 नागरिकांचा मृत्यू
काश्मीर खोऱ्यात गेल्या पाच दिवसात दोन शिक्षकांच्या हत्येमुळे मृतांची संख्या सात झाली आहे. यात अल्पसंख्याक समाजातील चार जणांचा समावेश आहे. याबाबत डीजीपी म्हणाले की, आम्ही या घटनेमुळे दुःखी आहोत. मागील प्रकरणांसह या घटनेवरही आम्ही काम करत आहोत. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत, आता लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल.