जम्मू काश्मीर : लष्कराच्या गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू, 6 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 03:22 PM2017-08-01T15:22:16+5:302017-08-01T15:26:09+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दगडफेक करत निदर्शनं करणा-यांमधील एकाचा लष्काराच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दगडफेक करत निदर्शनं करणा-यांमधील एकाचा लष्काराच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, याठिकाणी झालेल्या चकमकीत लष्काराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. एका पोलीस अधिका-याने सांगितलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या व्यक्तीची अधिकृत स्वरुपात माहिती मिळालेली नाही. मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये नेणा-या स्थानिकांकडून त्याचे नाव फिरदौस अहमद असल्याचे समजले.
अधिका-यानं सांगितले की, लष्काराच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका व्यक्तीला पुलवामा जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चकमक सुरू असलेल्या ठिकाणाजवळ स्थानिकांची हिंसक प्रदर्शनं सुरू होती. याविरोधात सुरक्षा दलातील जवानांनी केलेल्या कारवाईत जवळपास 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी अभियान राबवणा-या सुरक्षा दलातील जवानांवर 100 हून अधिक जणांकडून दगडफेक सुरू करण्यात आली. दगडफेक करणा-यांना पांगवण्यासाठी अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
ज्यावेळी जवान चकमकीच्या ठिकाणाहून परतत होते त्यावेळी काही युवकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात निदर्शकाचा मृत्यू झाला. दरम्यान, दगडफेक करणा-यांना प्रत्युत्तर देताना जवानांनी केलेल्या गोळीबारात हॉस्पिटलमधील नर्ससहीत दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान आणखी दोन जणांना जखमी स्वरुपात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र या दोन व्यक्ती कुठे जखमी झाले याची माहिती स्पष्ट झालेली नाही. यादरम्यान, काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी अबू दुजानासहीत तीन दहशतवादी मारले गेले. दुजाना हा पाकिस्तानी नागरिक होता.
अबू दुजानाच्या खात्म्यानंतर खबरदारी म्हणून काश्मीर खो-यामध्ये मंगळवारी शाळा व कॉलेज बंद करण्यात आले. शाळा-कॉलेजांसोबत मोबाइल इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुजानाच्या खात्म्यानंतर काही लोकांकडून काश्मीरच्या काही ठिकाणी दगडफेक व घोषणाबाजीच्याही घटना समोर आल्या आहे. दरम्यान, आता येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी शाळा-कॉलेज व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.