पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 15:27 IST2018-07-10T12:33:21+5:302018-07-10T15:27:24+5:30
मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या

पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
श्रीनगर : मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. तेव्हापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. पीडीपीचे आमदार अगदी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत आहेत. पक्ष नेतृत्त्वाकडून घराणेशाही जोपासली जात असल्याचा आरोप आमदारांकडून केला जात आहे.
भाजपा गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडला. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्ता गेल्यानंतर आता पीडीपीच्या आमदारांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं नाराज नेते आबिद अन्सारी यांनी म्हटलं आहे. शिया नेते इमरान अन्सारी रजा यांनी गेल्याच आठवड्यात पीडीपी सोडत असल्याची घोषणा केली होती.
मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांचा भाऊ तसद्दुक सिद्दीकी यांना पर्यटन मंत्रीपद दिलं होतं. तर मुफ्ती यांचे मामा सरताज मदनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते. यामुळे पीडीपीचे अनेक आमदार नाराज आहेत. मुफ्ती यांच्याकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं जात असल्याची उघड टीका बारामुल्लाचे आमदार जावेद हुसेन यांनी केली आहे. गुलमर्गचे आमदार मोहम्मद वाणी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्यावरुन पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीडीपीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.